द्विराष्ट्रवादापासून फाळणीपर्यंत
हिंदू व मुसलमान हे एकाच देशातील दोन राष्ट्रे ( कौम ) आहेत , असे म्हणणे सर सय्यद अहमद यांनी १८८७ सालापासूनच मांडले होते . त्याआधारे सत्तेत प्रतिनिधित्वाच्या मागण्या झाल्या ; पण फाळणीची मागणी १९४० सालीच प्रथम झाली .. धर्म-पंथ-जातनिरपेक्षपणे सर्वाना समान हक्क देणारे सार्वभौम राष्ट्र निर्माण करण्याचे काँग्रेसचे तिच्या स्थापनेपासूनचे उदात्त ध्येय सहज साध्य होणारे नव्हते. त्या स्वतंत्र राज्यातील सत्तेत आम्हाला किती वाटा मिळणार, असे प्रश्न उपस्थित करून काही वर्ग काँग्रेसविरोधात उभे ठाकले. यापैकी एक वर्ग हिंदू समाजातील ब्राह्मणेतरांचा होता. आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात तो वाटा मिळावा असे या वर्गाला वाटत होते. त्यातील काही गटांनी आपल्याला विधिमंडळात मिळणारा राखीव वाटा स्वतंत्र मतदारसंघामार्फत (म्हणजे त्या जाती प्रतिनिधी त्याच जातीच्या मतदारांनी निवडण्याची पद्धत) मिळावा, अशीही मागणी केली होती. तथापि, या वर्गाचे समाधान करून भारताची राज्यघटना त्यांना स्वीकारण्यास लावण्यात काँग्रेसला यश मिळाले. काँग्रेसच्या वरील ध्येयाला विरोध करणारा दुसरा व